शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्यसरकारच्या विरोधात डॉ.शिंगणेंचा एल्गार ,राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १४ जुलैला सिंदखेडराजात मोर्चाचे आयोजन
सिंदखेडराजा-संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने येत्या १४ जुलै रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिली असून याकरिता सिंदखेडराजा येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी ही माहिती दिली.
या बैठकीस सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील आजी-माजी लोकप्रतिनिधी,सरपंच , नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य, बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघांचे पदाधिकारी, बूथप्रमुख आणि अनेक सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्च्यामध्ये प्रामुख्याने शेतीकरिता असणाऱ्या खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतीच्या विम्या संदर्भातले धोरण,विजेची समस्या,रोहीसारख्या वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान,शेतमालाचे पडलेले भाव,शेतमाल विक्री संदर्भात होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक,कृषीविभागात असलेला भ्रष्टाचार आदी प्रश्नांबाबत राज्य सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती डॉ.शिंगनेनी यावेळी दिली.
दरम्यान परतूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व महिलांबाबत केलेल्या निंदनीय वक्तव्याचा बैठकीमध्ये निषेध करण्याचा ठराव संमत केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशेल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल भट,प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे यांनी केले.
बोलण्यासारखे बरेच काही मनामध्ये आहे परंतु आज शेतकऱ्यांच्या मोर्चा संदर्भात नियोजन बैठक असून येत्या १४ तारखेलाच मी सर्व बाबतीत बोलेन असे डॉ.शिंगणेनी बैठकीत सांगितले असून आता ते नेमके काय अन कुणाबद्दल बोलणार याची उत्सुकता येत्या १४ जुलै पर्यंत कार्यकर्त्यांच्या मनात आहे.